ब्लॉग

स्वप्नांची पूर्तता करणारा वाड्याचा गणपती बाप्पा

मंदिरामधे यायचे, शांतपणे गणपती बाप्पा समोर उभे राहून बाप्पाचे स्मरण करायचे, आपल्या मनामधील स्वप्न मनातल्या मनामधे बाप्पाला सांगायचे आणि आपल्या मनामधे जे स्वप्न आहे, त्या स्वप्नाकडे वाटचाल करण्यास प्रामाणिकपणे व मेहनतीने सुरुवात करायची, यश नक्कीच मिळते, अशी ख्याती असणाऱ्या वाडा तालुक्यातील 'स्वप्नपूर्तीचा गणपती बाप्पा' मंदिरामधे माघी गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात व भाविकांच्या उस्फूर्त गर्दीमधे साजरा होतो. 
       वाडा शहरातील शरद नगर मधील या गणपती बाप्पाच्या मंदिरामधे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. वर्षातून एकदा माघी गणेशोत्सवामधे तर गर्दीचा उच्चांक गाठला जातो. मंदिरामधे रोजची आरती भजन व कीर्तनाचे कार्यक्रम नियमितपणे होतात. माघी गणेशोत्सवानिमित्त महाअभिषेक, होमहवन, भजन, किर्तन व महाभंडारा आयोजीत केला जातो. यावर्षीही मंदिर ट्रस्ट ने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 
       या मंदिरातील गणपतीची मूर्ती एकदम वेगळी आहे. तिला महाभारताचा संदर्भ आहे. व्यासांनी सांगितलेले आणि श्री गणपतींनी लिहिलेले महाभारत म्हणूनच मूर्तीच्या हातामधे मोरपंखी पेन असुन मूर्तीची भावमुद्रा हातामधे ग्रंथ घेऊन लिहितानाची आहे. हातामधे कुठलेही शस्त्र नाही. एक हात आशिर्वाद देताना, दुसरा हात लिहिताना, तिसरा हात ग्रंथ धरलेला तर चौथ्या हातामधे शंख आहे. बाप्पाला जास्वंदीचे फुल आवडते म्हणून, लाल रंगाच्या जास्वंदीच्या फुलांच्या सिंहासनावर बाप्पा विराजमान झालेले आहेत. एक आगळीवेगळी पण वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती या सर्वांगसुंदर मंदिरामधे पाहायला मिळते.
       पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधे शरदनगरमधे हे प्रसिद्ध मंदिर आहे. श्री गणपती बाप्पाला एका भाविकाने आपले स्वप्न सांगितले व 'माझे स्वप्न पूर्ण झाले तर स्वप्नपूर्ती मंदिर बांधीन' असा नवस केला. अल्पावधीतच त्या भाविकाचे स्वप्न पूर्ण झाले, त्यामुळे त्या भाविकाने स्वखर्चाने मंदिर उभारले आहे. त्यामुळेच या मंदिरातील गणपतीला 'स्वप्नपूर्तीचा बाप्पा' असे म्हणतात. आता असंख्य भाविक या मंदिरामधे आपली स्वप्न घेऊन येतात व ते पूर्ण होतात मोठ्या भक्तीभावाने माघी गणेशोत्सवामधे नवस फेडतात. अनेकांना स्वप्नपूर्तीची अनुभूती आल्याने या मंदिराची ख्याती दूरवर पसरली आहे.