*शरद नगरचा*
*स्वप्नपूर्ती बाप्पा*
*'Dream it, believe it, do it'* या शब्दांनी माझं आयुष्य पुरतचं बदलुन गेलयं. ' स्वप्न बघा, त्यावर विश्वास ठेवा आणि ती प्रत्यक्ष कृतीमधे आणा ' असा त्याचा अर्थ. माझा या शब्दांवर खुप विश्वास आहे. मी खुप स्वप्न पाहतो. पण ती जागेपणी. डोळे उघडे ठेऊन. मी पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नांवर अंत:करणापासून प्रेम करतो. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. मोठ्या जिद्दीने आणि परीश्रमाने यश खेचून आणतो. म्हणूनच माझा जागेपणी पाहिलेल्या स्वप्नावर प्रचंड विश्वास आहे.
मी अत्यंत गरीबीच्या परिस्थितीमधून आलोय. भयावह अशी गरीबी मी अनुभवलीय. पडेल ती कामे केलीत. *त्यातच जन्माला येतानाच मी कुरूप म्हणून जन्माला आलो होतो. मला नीटसा चेहराच नव्हता. ओठ फाटलेले, दात पुढे आलेले, वेडेवाकडे. खुपच विचित्र चेहरा दिसायचा. त्यातच घरात प्रचंड गरीबी. सर्वार्थाने प्रतिकुल परिस्थिती होती. त्यामुळे गरीबांची पोरं जशी पडत - उठत वाढतात, पुढे येतात तसाच मी ही आल्याने, गरीबांच्या पोरांनी पाहिलेल्या स्वप्नांची जशी माती होते, तशीच ती माझ्या शेकडो स्वप्नांची झालीय. अनेकदा अपयश आलेय. संकट तर एवढी आलीत की, त्यांची आठवण काढली तरी अंगावर काटा उभा राहतो.*
मात्र कितीही संकट आली तरी मी स्वप्न पाहाणं काही सोडलं नाही. स्वप्नांची पुर्तता करताना साध्या - साध्या गोष्टींसाठी खुप मोठा संघर्ष करावा लागला. रोजच्या उगवत्या सुर्याबरोबर रोज नवे संकट हात जोडून पुढे उभे राहायचे. मग त्या संकटावर स्वार होऊनच पुढे जावे लागायचे. प्रत्येक पावलागणिक संकटांची चाहुल लागायची. पण स्वप्नांवर विश्वास होता. त्यामुळे जिद्द सोडली नाही. घाबरायचा तर प्रश्नच नव्हता.
कोणत्याही परिस्थितीमधे स्वप्न पूर्ण करायची होती. त्यासाठी कुठलीही किंमत मोजायची तयारी होतीच. स्वप्नांवर श्रद्धा होती. म्हणूनच एक स्वप्न भंगलं की दुसरं पाहायचो. दहा पैकी एखाद्या स्वप्नांमधे यश यायचे. कळायला लागल्यापासूनच या स्वप्नमय जगातच वावरत आलोय. त्यामुळे स्वप्न पाहायची एक सवयच जडली. *या सवयीतुनच एक भलंमोठं स्वप्न पाहिलं स्वतःच्या नावाचं स्वतःचं एक सर्वांग सुंदर व सर्व सोयींनी सुसज्ज असलेलं माझ्या स्वप्नातलं नगर उभारायचं.*
माझ्या पुर्ण खानदानामधे कुणी पत्रकार नव्हतं. मात्र मी स्वप्न पाहिलं एक यशस्वी पत्रकार व्हायचं. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधे मी ते पूर्ण केलं. सलग ३७ वर्षे मी पत्रकारिता करतोय. महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांतून मी लिखाण केलंय. आजही करतोय.
नुसता पत्रकार होऊन माझं मन रमत नव्हतं. मला माझं स्वतःचं वृत्तपत्र काढायचं होतं. तेही वाड्यासारख्या ग्रामीण भागातून. १९९४ मधे वाडा शहरातील पेपर स्टॉलवर फक्त २० पेपर यायचे. त्यापैकी नवाकाळ, लोकसत्ता, मुंबई सकाळ व सामना हेच चार पेपर कसेबसे संपायचे. तेही शासकीय अधिकारीच विकत घ्यायचे. *अशा परिस्थितीमधे एक स्वतंत्र वृत्तपत्र काढायचं स्वप्न पाहिलं आणि वयाच्या २३ व्या वर्षी ' शब्द मशाल ' नावाचं वृत्तपत्र सुरू केलं.*
आज या वृत्तपत्राला ३१ वर्ष पूर्ण झालीत. या वृत्तपत्राच्या जोडला ' शब्द संग्राम ' हे वृत्तपत्रही सुरू केलं. हे दोन्ही वृत्तपत्र प्रचंड खपाची व वाचकांच्या आवडीची वृत्तपत्र म्हणून ओळखली जातात. अनेक संकटांवर मात करून ती दोन्ही वृत्तपत्र सुरू आहेत. चांगल्या संपादकांमधे माझी गणना होते, हे विशेष.
पत्रकार झाला, संपादन झालो. मग लेखक व्हायचं ठरवलं. कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ वाचन व अभ्यास करून मी लेखन झालो. आजच्या घडीला सर्वाधिक लिखाण करणारा लेखक म्हणून माझे नाव आहे. अनेक मान्यवरांच्या हस्ते माझ्या पुस्तकांची प्रकाशने झालीत. एक वेगळा वाचक वर्ग राज्यभर निर्माण करण्यात यश मिळवलय आणि विविध विषयांवर मी अनेक पुस्तके प्रकाशित केलीत.
*अशी न जमणारी अनेक स्वप्न मी पाहिली आणि जिद्दीने ती पूर्णही केली. मी पाहिलेल्या आणि पूर्ण केलेल्या स्वप्नांची यादी खुप मोठी आहे. त्यापैकीच एक स्वप्न म्हणजे बिल्डर बनण्याचे.*
मी कला शाखेचा पदवीधर आहे. माझ्याकडे बिल्डर बनण्यासाठीचे कुठलेही ज्ञान नव्हते. मात्र इतर स्वप्नांबरोबरच बिल्डर बनण्याचे स्वप्न मनामधे पिंगा घालु लागले. मी त्याच कल्पनांमधे रमु लागलो. इतर बिल्डरांच्या साईटवर जाऊन अनुभव घेऊ लागलो. मी वाडा शहरातीलच आर्किटेक महेश जाधव यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेतली. मग स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागलो. शहरातील ' यशवंत नगर ' मधे मी ' यशलक्ष्मी कॉम्प्लेक्स ' नावाची बिल्डींग बांधायला घेतली.
जवळ फारच थोडे पैसे होते. मात्र स्टेट बँकेचे मॅनेजर श्री. विद्यासागर प्रसाद यांनी साथ दिली. त्यांनी बिल्डरला बिल्डींग बांधायला बँक कर्ज देत नाही म्हणून वेगळ्या मार्गाने मदत करून मला १० लाखांचे कर्ज दिलं. त्या पैशांवरच *' यशलक्ष्मी कॉम्प्लेक्स '* ची पायाभरणी केली. आज परळी नाका येथे यशवंत नगर आकाराला येत आहे, तिथे मी जेव्हा बिल्डींग बांधायला घेतली तेव्हा एकही इमारत नव्हती. शहरापासून एवढ्या लांबवर बिल्डींग बांधून फ्लॅटची विक्री करणे, हे सर्वांनाच अशक्य वाटत होतं. मात्र अशक्य गोष्टीही मी जिद्दीने परश्रमांच्या जोरावर शक्य करून दाखवली. आणि जिथे एकही बिल्डींग नव्हती तेथे आज ओळीने बिल्डींग उभ्या राहत आहेत.
*' यशलक्ष्मी कॉम्प्लेक्स '* ची निर्मिती करताना खुप अनुभव आले. दिवस - रात्र फक्त याच इमारतीचा ध्यास घेतला होता. झपाटल्यागत काम करत होतो. अनेक अडचणी आल्या. पहिली गोष्ट म्हणजे, *' मी बिल्डींग पूर्ण करेन की नाही '* हीच शंका अनेकांच्या मनामधे होती. त्यामुळे फ्लॅटची बुकिंग होत नव्हती. मात्र दोन वर्षाच्या आत मी इमारत बांधुन पूर्ण केली. त्यामुळे लोकांचा विश्वास बसला आणि फ्लॅट विकले गेले. घेतलेले कर्ज पूर्णतः फेडले. मात्र दोन वर्षामधे जे अनुभव आले ते पाहता दुसरी नवीन बिल्डींग बांधावी की नाही, असा प्रश्न पडला होता.
बांधकाम व्यवसाय हा माझ्या दृष्टीने खुपच नवा होता. त्यामुळे थकलो होतो. मात्र व्यवसाय आवडला होता. एक सुंदर इमारतीची निर्मिती माझ्या हातुन झाली होती. ही इमारत कायमस्वरूपी राहणार होती. आपला मृत्यूनंतर मागे काय उरतं ? ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवुन दिलेय. त्यामुळे स्फुरण चढले. हार मानायची नाही, असे ठरवले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मी अभ्यासक आहे. लहानपणीच त्यांचा इतिहास अनेकदा वाचलाय. बिल्डर बनताना या अभ्यासाचा खूप फायदा झाला. छत्रपतींची कारकिर्द सुमारे चारशे वर्षांपूर्वीची त्यावेळी कसलेही तंत्रज्ञान नसते. यंत्रणा नव्हती. वाहतुकीची व्यवस्था चांगली नव्हती.
त्यावेळच्या आणि आजच्या परिस्थितीमधे जमीन आस्मानाचा फरक आहे. मी तंत्रज्ञान हातात घेऊन फिरतोय. काॅम्प्युटरच्या जमान्यामधे वावरतोय. वातानुकूलीत कार्यालयामधे बसुन सर्वकाही हाताळु शकतो. तरीही मी एक बिल्डींग बांधुन थकलोय. छत्रपतींनी त्याकाळामधे ३०० हुन अधिक किल्ले बांधले. हेही उंच डोंगरावर, पाण्यात, जंगलात, जिथे कुणीही पोहोचू शकत नाही तिथे महाराजांनी गड - किल्ले बांधले आणि मला सगळ्या सुविधा असताना, सर्व यंत्रणा हातामधे असतानाही मी एकापेक्षा जास्त इमारती चांगल्या सपाट जागेवर बांधु शकत नाही. मग छत्रपतींचे नाव तरी कशाला घ्यायचे?
मनामधे विचारांचा गोंधळ सुरू झाला. पाच दिवस विचार करत तळमळत काढले. शेवटी निश्चय केला. *महाराजांनी स्वराज्यासाठी शेकडो गड - किल्ले त्या काळात बांधले आपण स्वतःसाठी किमान ३०० फ्लॅट तरी बांधु. या विचाराने सर्व प्लॅनिंग सुरू केले आणि ते करत असतानाच ' या शहरामधे एक स्वतःचे नगर उभे करायचे,' असे स्वप्न पाहून कामाला लागलो.* समोर असंख्य अडचणी होत्या. पैशांची चणचण होती. इतरही अनेक बाबी होत्या. त्यामुळे हिम्मत होत नव्हती.
वर्ष तसेच गेले. काय करायचे हा मोठा प्रश्न होता. जमेल का ? असे वारंवार वाटत होते. रोज फक्त स्वप्नचं रंगवत होतो. *अखेर निर्धार केला आणि माझ्या लाडक्या गणपती बाप्पा समोर उभा राहिलो. डोळे मिटले. शांतपणे बाप्पाचे स्मरण केले. विनम्रपणे हात जोडून मनातले स्वप्न बापाला सांगितले आणि माझे स्वप्न पूर्ण झाले तर मी बाप्पाचे मंदिर त्या नगराच्या प्रवेशद्वारावर उभारीन, असा संकल्प केला. बरोबर दि. १ जानेवारी २०११ रोजी नगराचे भूमिपूजन केले आणि कामाला सुरुवात केली.*
खिशामधे काहीही नसताना स्वतःचे एक नगर उभारायचे स्वप्नं पाहून व फक्त बाप्पावर श्रद्धा ठेवून कामाला लागलो. त्याच वर्षापासुन घरामधे गणेशोत्सवामधे गणपती बाप्पा विराजमान करू लागलो आणि शरद नगरमधे माघी गणेशोत्सव साजरा करू लागलो. हा माझ्यामधे झालेला खुप मोठा बदल होता. अनेकांनी त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. २०११ पर्यंत मी नास्तीक होतो. माझी स्वतःवर श्रद्धा होती. स्वतःच्या हिंमतीवर जिद्दीवर, मेहनतीवर व प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास होता. देवाला मी फारसा मानत नव्हतो. मात्र जेव्हा अशक्य वाटणारे काम हाती घेतले तेव्हा मात्र देवासमोर नतमस्तक होण्यावाचुन पर्याय राहिला नव्हता. *कुणावर तरी श्रद्धा असावी लागते. मी अंधश्रद्धा पाळत नाही. मी कुठल्याही बाबा - बुवाला गुरु केलेले नाही की हातात कुठल्या खड्यांच्या अंगठ्या, गळ्यात माळा व कुणी दिलेले गंडेदोरे कधीही बांधले नाहीत.*
२०११ ला शरद नगरच्या उभारणीस सुरुवात करताना मात्र गणपती बाप्पावर मनोमन श्रद्धा ठेवली. ' माझे हे स्वप्न पूर्ण होऊ दे ' अशी प्रार्थना वारंवार केली. आज २०२५ ला मी या निर्णयापर्यंत पोहोचलोय की, कुणी कितीही नाकारले तरी देव आहे. मी जेव्हापासून बाप्पाला मानायला लागलो, श्रद्धा ठेवु लागलो. तेव्हापासून या विषयाचा अभ्यास सुरू केला आणि प्रत्येकाने कुणावर ना कुणावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे. कुणाला तरी साक्षी ठेवून कुणासमोर तरी नतमस्तक होऊनच कार्याला प्रारंभ केला पाहिजे. कुणाला तरी घाबरलं पाहिजे, तरच हाती घेतलेलं कार्य पूर्ण होतं. हे मला उमगलं आणि मी गणपती बाप्पाला खुप मानायला लागलो. मात्र माझी श्रद्धा डोळस होती. आंधळेपणाने मी काहीही करत नव्हतो. म्हणूनच माझा बाप्पा सर्वांपेक्षा वेगळा होता. मी मानेन तसा होता. माझे हे ' शरद नगर ' उभारण्याचे स्वप्न त्याच्याच साक्षीने पूर्ण होतेय म्हणून तो माझा स्वप्नपूर्ती करणारा ' स्वप्नपूर्ती बाप्पा ' होता. शरद नगरच्या प्रवेशद्वारावरच त्यांचे मंदिर होतेय म्हणून तो शरद नगरचा ' शरदेश्वर ' बाप्पा झाला. माझ्या बापाची मूर्तीही खुप वेगळी आहे. बाप्पाला जास्वंदीचे फुल आवडते म्हणून तो जास्वंदीच्या फुलांच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे. व्यासांनी सांगितलेले आणि गणपतीने लिहिलेले महाभारत प्रसिद्ध आहे. म्हणूनच माझा बाप्पा हातात ग्रंथ व पेन घेतलेला आहे. बापाच्या चारही हातामधे शस्त्र नाही. एक हात आशिर्वाद देताना, दुसऱ्या हातामधे शंख, तिसऱ्या हातामधे ग्रंथ तर चवथ्या हातामधे पेन आहे. बाप्पा ग्रंथ लिहिताना बसलेला आहे, अशी ही मुर्ती आहे. ही मुर्ती जगभरात इतरत्र कुठेही आढळणार नाही. कारण, ती मी माझ्या पद्धतीने बनवून घेतली आहे, मुर्तीचे वजन ३०० किलो आहे. उंची ३ फुट आहे आणि राजस्थान मधील कलाकाराकडून मी खास बनवून घेतली आहे. माझा बाप्पा हा असा जगावेगळा आहे. माझ्या स्वप्नातला हा बाप्पा आहे.
या बाप्पाच्या समोर नतमस्तक होवून एक भव्य - दिव्य स्वप्न पाहिले. ते कधी - कळी पूर्ण होईल की नाही याची कुठलीही शक्यता नव्हती. कारण जी जागा या नगरासाठी मी निवडली ती शहरापासून थोडी लांब ऐनशेत रोडवर होती. सर्वांनाच ती जागा लांब वाटायची. या जागेवर सुरुवातीला बिल्डींग बांधुन नगर उभारायचे असा प्लॅन होता. त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध होताच मला सर्वांनाच वेड्यात काढले *" एकही फ्लॅट विकला जाणार नाही. एवढ्या लांब कोण जाईल ? शहरामधे एवढा बिल्डींग आहेत. त्यांनाच ग्राहक मिळत नाहीत, तर तिकडे कोण घेईल ?"* अशा नको त्या आणि नको तेवढ्या शंका विचारल्या जात होत्या.
मात्र याच शंका *' यशवंत नगर '* मधेही ' यशलक्ष्मी कॉम्प्लेक्स ' उभारतानाही विचारल्या गेल्या होत्या. ज्या जागेवर लोकं संध्याकाळ होताच जायला घाबरायची, त्या जागेवर आजुबाजुला कुठलीही बिल्डींग नसताना आणि शहराच्या पूर्णपणे बाहेर असलेल्या जागेवर ही बिल्डींग बांधुन विकुनही दाखवली होती. त्यामुळे या शंका - कुशंकांचा अनुभव होता. सुरुवातीला खुप अडचणी येतात, हे ही माहिती होतं. म्हणूनच डगमगलो नाही ' स्वप्नपूर्ती बाप्पा ' वर पूर्णतः श्रद्धा ठेवून अत्यंत नियोजन पूर्वक कामाला सुरुवात केली.
भूमिपूजनाच्या दोन महिन्या आधी म्हणजे दसऱ्याला प्रत्यक्ष जागेवर जाऊन एक जाहिरातीचा बॅनर लावला. लवकरच येथे शरद नगरची सुरुवात होणार आहे. दसरा ते १ जानेवारी या दरम्यान शरद नगरची जोरदार चर्चा घडवुन आणली. वृत्तपत्रामधूनही जाहिरात केल्या. पत्रके वाटली. होर्डिंग्ज लावली. ज्या - ज्या माध्यमातुन लोकांपर्यंत पोहचता येईल त्या - त्या माध्यमातुन लोकांपर्यंत पोहोचलो. त्यामुळे *' शरद पाटील आता नवीन बिल्डींग बांधतोय '* ही चर्चा सर्वदूर पोहोचली होती. त्याचा फायदा भुमीपुजनाच्या दिवशी झाला. भुमीपुजनाला मोठ्या संख्येने लोकं आली. *' यशलक्ष्मी कॉम्प्लेक्स '* ही पहिली बिल्डींग वेळेत बांधुन विश्वास कामावला होता. त्या विश्वासाच्या बळावरच भुमीपुजनाच्या दिवशीच पहिल्या बिल्डींगमधील ३० पैकी १८ फ्लॅटची बुकींग झाली आणि स्वप्नपूर्ती बाप्पाने पहिला कौल दिला आणि मी जिंकलो. पहिल्याच दिवशी निम्म्याहुन अधिक फ्लॅट विकले गेल्याने झालेला आनंद हा अवर्णनिय होता. ग्राहकांनी विश्वास ठेवला होता. गेली अनेक वर्षे मी वाडा शहरामधे राहतोय. लोकं मला चांगल्या प्रकारे ओळखतात. *' शरद पाटील यांनी एकदा काम हाती घेतली की, तो ते पूर्ण करतोच आणि तो कुणाला फसवणार नाही, या दोन गोष्टींवर लोकांच्या विश्वास होता.* तोच विश्वास कामाला आला. इतर बिल्डरांनी बिल्डींग अपूर्ण ठेवल्या होत्या. कुणी अर्धवट कामे सोडून दिली होती. चार - चार वर्षे बिल्डींग पूर्ण होत नव्हत्या. अनेक ग्राहकांची फसवणूक झाली होती. चाळीतून फ्लॅटमधे यायचे सर्वांचे स्वप्न होते. मात्र बिल्डरांवर कुणाचाच विश्वास नव्हता. अशा वेळी *' आम्ही शब्द देतो, आम्ही शब्द पाळतो '* अशी जाहिरात करून ग्राहकांना विश्वास दिला. त्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवला.
मी स्वतःच खेडेगावातून आल्याने माझ्याही फ्लॅट बाबत काही संकल्पना होत्या. स्वप्न होती. त्यामुळे फ्लॅट घेणाऱ्याला नेमकं काय हवे ते मला कळत होतं. मी वाडा शहरात जेव्हा राहायला आलो तेव्हा गॅस एजन्सी जवळच्या शिंदे चाळीत १५० रुपये भाड्याने एका छोट्याशा १० बाय १० स्क्वेअर फुटाच्या खोलीत राहत होतो. तेथेच एक टेबल व खुर्ची टाकुन ऑफिस थाटले होते. फ्लॅट घ्यायचे स्वप्न होते पण घेता आला नाही. म्हणून पहिल्या १०० स्क्वेअर फुट रूम पेक्षा थोडा मोठ्या ३०० स्क्वेअर फुटाच्या चाळीतील रूममधे पिक कॉलनीमधे राहायला गेलो. फ्लॅटचे स्वप्न मनामधे पिंगा घालत होते. मात्र ते शक्य होत नव्हतं. १९९० ते २००४ १४ वर्ष स्वप्न पाहण्यातच गेली. नंतर निश्चय केला, फ्लॅट घ्यायचाच. त्यावेळीही स्टेट बँक कामाला आली. बँकेने कर्ज दिलं आणि मग विठ्ठल मंदिराजवळ मशाल टॉवर मधे ५९० स्क्वेअर फुटाचा वन बिएचके फ्लॅट घेतला. *गावातून शहरात, लहान रूम मधून मोठ्या रूममधे आणि मोठ्या रूममधून फ्लॅटमधे जाताना १४ वर्षांचा प्रवास नजरेसमोर होता. त्यामुळे फ्लॅटचे स्वप्न काय असते ? आणि ते पूर्ण करायला सामान्य माणसाची हालत काय होते? हे मी खुप जवळून अनुभवले.* म्हणूनच बिल्डर बनताना, एक नवे स्वतःचे नगर वसवताना खुपच विचार करून चांगले नियोजन केले.
या माझ्या नगरामधे काय हवे, काय नको ? याबाबत आराखडे तयार केले. स्वप्नपूर्ती बाप्पाला स्मरून कामाला सुरुवात करतानाच शपथ घेतली की, *कुणाचीही फसवणूक होणार नाही, याची काळजी घेईन. सर्वांना सहकार्य करेन, ब्लॅकचा पैसा स्विकारणार नाही. सर्व व्यवहार पारदर्शक करेन.* हे सर्व कठीण होतं. सुरुवातीला इतर बिल्डरांनी याची खिल्ली उडवली. बिल्डरचा धंदा कधीही पारदर्शक होऊ शकत नाही. मात्र मी तो करून दाखवला. सुरुवातीपासुन आजपर्यंत मी एकाही ग्राहकाकडून ब्लॅकमनी स्वीकारलेला नाही. आतापर्यंत मी अनेक फ्लॅट विकलेत. *अनेक कुटूंब आज शरद नगरमधे राहात आहेत. त्यापैकी एका ग्राहकाने तरी सांगितले की, मी त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पैसे घेतलेत किंवा त्यांची फसवणूक केलीय. तर त्याच दिवशी मी हा व्यवसाय बंद करेन.* स्वप्नपूर्ती बाप्पाच्या आशीर्वादाने ती वेळ माझ्यावर आलेली नाही. बिल्डरचा व्यवसायही अत्यंत पारदर्शकपणे करता येऊ शकतो. हे मी दाखवुन दिले.
व्यवहारामधे विश्वास आणि पारदर्शकता आणताना अनेक नव्या योजना मी ग्राहकांच्या समोर ठेवल्या व हवे ते सहकार्य केले. त्यापैकीच सर्वात लोकप्रिय ठरलेले स्कीम म्हणजे शून्य टक्के व्याजदर. फ्लॅट घ्यायची प्रत्येकाचीच इच्छा असते मात्र गरीब व्यवसायीकांकडे इन्कम टॅक्स फाईल नसते. कागदपत्र नसतात. त्यामुळे बँका त्यांना कर्ज देत नाहीत. अशा लोकांसाठी ही स्कीम मी राबवली. या स्कीममधे अनेक ग्राहकांनी भाग घेतला.
या स्कीम मधे ग्राहकांना ठरावीक हप्ता ठरवुन दिला नव्हता. त्यांना जमेल तसे पैसे त्यांनी एका ठराविक कालावधीमधे द्यायचे. त्यामुळे जेवढी रक्कम फ्लॅटची असेल तेवढीच रक्कम आम्ही घ्यायचो. त्यामुळे व्याजाची झंझट आणि बँकांची कटकट उरलीच नाही. ग्राहकांचाही खूप फायदा झाला. माझ्याकडे फ्लॅट घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सहकार्य केले. त्यामुळे नगरामधे फ्लॅट घेणाऱ्यांची संख्याही वाढली.
*"धंदा प्रामाणिकपणे आणि मेहनतीने केला की, यश मिळतेच मिळते. आपण कुणाची फसवणूक केली नाही की, आपलीही कुणी फसवणूक करत नाही आणि पाळता येईल तोच शब्द इतरांना द्यावा, खोटी आश्वासने कुणालाही देऊ नयेत"* हे तत्व मी नगर उभं करतानाच अंगिकारल्याने लोकांचा विश्वास बसला. मग मी माझ्या स्वप्नातील नगर उभाराला सुरुवात केली.
*माझ्या या नगरामधे सर्व जाती - धर्माची लोकं गुण्या - गोविंदाने नांदतील, त्यांच्यामधे कुठलेही हेवे दावे असणार नाहीत. वाद-विवाद होणार नाहीत. सर्वजण एकत्र येऊन नगराचा विकास करतील. सण - उत्सव आनंदाने व उत्साहाने साजरे करतील. संस्कृती, परंपरा जपतील. लहान - थोर सर्वच एकत्रीतपणे सर्व व्यवहार सुरळीत करतील. या नगरामधे चोऱ्या होणार नाहीत. चांगल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था असेल. पार्किंगची समस्या कुणालाही उद्भवणार नाही. मुलांना खेळायला मैदान, चांगला बगीचा, चांगले रस्त्ये, चोवीस तास पाण्याची सुविधा असेल, रस्त्यावर खड्डे असणार नाहीत. हे नगर शहरामधे असले तरीही शहरापासून लांब असल्याचा आणि वातावरण शांत असल्याचा आनंद मिळेल. गरीबातल्या गरीबालाही या नगरामधे फ्लॅट घेता येईल. फ्लॅटमधे चांगल्या सुविधा असतील आणि इमारतीचं बांधकाम उच्चप्रतीचे व दर्जेदार असेल.*
माझ्या या नगरामधे माझ्या स्वप्नपूर्ती बाप्पाचे मंदिर असेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत खेळण्याच्या व फिरण्याच्या सुविधा असतील. हे एक आदर्श नगर असेल. या आणि अशा अनेक बाबींचा अभ्यास करून व स्वप्नपूर्ती बाप्पाला स्मरुणच नगराच्या उभारणी सुरुवात केली.
पहिल्या इमारतीच्या भूमिपूजनालाच बाप्पाने आशीर्वाद दिला. चांगल्या लोकांनी फ्लॅटची बुकींग केली. त्यामुळे हुरुप वाढला. काम करायला उत्साह आला. ज्या दिवशी काम सुरू केले त्या दिवसापासुन आजपर्यंत नगराच्या उभारणीचे बांधकाम थांबलेले नाही. अनेक अडचणी, संकटे आली मात्र बाप्पाच्या आशिर्वादाने सर्व काही सुरळीत झाले .
बाप्पाच्या अस्तित्वाचे अनेक अनुभव आले. जेव्हा - जेव्हा अडचणीमधे सापडलो. तेव्हा बाप्पाचे स्मरण करून संकटांवर मात केली. म्हणून शरद नगर हे वाडा शहरातील सर्वात चांगले नगर म्हणून लोकप्रिय झाले आहे. चांगल्या लोकांची राहण्यासाठी प्रथम पसंती ही या नगरालाच आहे. कारण या नगरामधे सुरक्षितता आहे, आनंद आहे, उत्साह आहे.
बाप्पाच्या आशीर्वादाने या सर्व गोष्टी शक्य झाल्या आहेत. माझी पात्रता नसतानाही मी स्वतःचं नगर उभारू शकलो, हे घडलं ते बाप्पावर ठेवलेल्या निस्सीम श्रद्धेमुळेच. बाप्पाला स्मरून अशक्य वाटणारे असे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण झाले बाप्पाच्या आशीर्वादानेच. ज्या बापाने मला योग्य तो मार्ग दाखवला, माझ्या स्वप्नांची पूर्तता केली, त्याच बाप्पाने माझ्या सारख्या असंख्य सामान्य माणसांचीही स्वप्नपूर्ती करावी, हीच त्या मागची प्रामाणिक भावना आहे. शेवटी कर्तुत्वाला आणि मेहनतीला श्रद्धेची जोडही असायलाच हवी. तरच यश मिळेल, हे मी अनुभवांतुन शिकलोय. त्याची प्रचिती सर्वांनाच यावी, हीच प्रामाणिक इच्छा.
बाप्पाचे मंदिर बांधण्याचे विचार मनात घोळत होते. मंदिराचा प्लॅन तयार होता. फक्त सुरुवात कधी करायची हाच मोठा प्रश्न होता. खर्चाची जुळवा - जुळव होत नव्हती. पूर्ण मंदिराचा खर्च हातात ठेवूनच कामाला सुरुवात करावी, असे वाटत होते. एकदा मंदिराच्या कामाला सुरुवात केली की, काम थांबता कामा नये. पैशाची कमी पडता कामा नये. इतरत्र मंदिरांची कामे वर्षानुवर्ष रखडलेली पाहत होतो. मात्र आपल्या बाप्पाच्या मंदिराचे काम रखडता कामा नये, असे ठरवूनच खर्चाचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करण्याचा मार्ग बाप्पानेच दाखवला. त्यामुळे एकूण बांधकामाचा अपेक्षीत खर्च बाजुला ठेवूनच कामाला सुरुवात करणार होतो.
पैशांची अडचण दुर झाली मात्र नवीनच अडचण उभी राहिली. दि. ८ मे २०१४ हा दिवस भुमीपूजनाचा दिवस ठरला होता. त्याचे नियोजन मार्च २०१४ पासुन सुरू केले होते. मात्र त्याच दरम्यान शरद नगरमधे एका दुसऱ्या बिल्डरने गणपती बाप्पाच्याच मंदिराचे बांधकाम त्याच्या जागेमधे सुरू केले आणि मला धक्काच बसला. एकाच नगरात अवघ्या १०० मीटरच्या अंतरावर गणपती बाप्पाचीच दोन मंदिरे होणार होती. त्यामुळे काय करायचे ? असा प्रश्न पडला. त्या बिल्डरला सांगुन पाहिले की, *'तुम्ही गणपती बाप्पा ऐवजी दुसऱ्या देवाचे मंदिर बांधा. कारण आम्ही बाप्पाच्या मंदिराचे आधिच नियोजन केलेले आहे. तसा प्रचारही झाला आहे. आमची तयारीही पूर्ण झाली आहे.'* पण त्यांनी उलट आम्हालाच सांगितले की, 'तुम्हीच दुसऱ्या देवाचे मंदिर बांधा.' त्यांचे उत्तर ऐकून पुरताच गोंधळूनच गेलो. त्यातच त्यांनी मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. काय करावे ? हा मोठा प्रश्न होता. काही सुचत नव्हते. म्हणून ८ मे चा भुमीपूजनाचा सोहळा पुढे ढकलला. काहीतरी पर्याय निघेल, बापाच योग्य तो मार्ग दाखविल, या आशेवर राहिलो.
बाप्पाच्या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात आता कशी करायची ? या विचारामधेच दोन महिने गेले आणि अचानक त्या बिल्डरने सुरू केलेले मंदिराचे बांधकाम अपूर्णच राहिले. बांधकाम अर्ध्यावरच सोडून तो बिल्डर निघुन गेला. त्याच्या इमारतींच्या प्रोजेक्टला सुरुवात होण्याआधीच प्रोजेक्ट बंद झाला. शरद नगरची वाटचाल यशस्वीरीत्या सुरू असतानाच शेजारच्या प्रोजेक्टची मात्र वाताहात झाली होती. अनेक कारणांनी त्यांना प्रोजेक्ट बंद करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी मंदिराचे बांधकामही अर्ध्यावरच सोडले होते. त्यांच्या मंदिराचे काम अपूर्ण राहताच आम्ही कामाला लागलो आणि १ जानेवारी २०१५ हा दिवस भूमीपूजनाचा दिवस म्हणून निवडला.
*श्रद्धापूर्वक जी इच्छा आपल्या मनामधे असते ती नक्कीच पूर्ण होते. तसेच झाले. बाप्पानेच दृष्टांत दिला आणि आता लवकरच माझ्या बाप्पाच्या मंदिराच्या बांधकामाचा प्रश्न आपोआप दूर झाला होता. मनावरचं मोठं ओझं हलकं झालं होतं.* मंदिराच्या बांधकामास सुरुवात करण्याआगोदर मनामधे अष्टविनायक दर्शन करण्याची ईच्छा होती. मी प्रत्येक बिल्डींगच्या भूमीपूजनाआधी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेऊन येतो. तेथुन आणलेला बेल - भंडार भूमीपूजनाच्या जागेवर उधळतो. ती माझी श्रद्धा आहे. बाप्पाचे मंदिर बांधकामास सुरुवात करण्याआगोदर अष्टविनायक दर्शन करणे आवश्यक वाटले. म्हणून दि. २५ डिसेंबर २०१४ रोजी कुटूंबीयांसह देवदर्शनाला निघालो. सलग तीन दिवस प्रवास करून *जेजुरीच्या खंडेरायांसह मोरगावच्या श्री मयुरेश्वर, सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक, पालीच्या बल्लाळेश्वर, महाडच्या श्रीवरदविनायक, थेऊरच्या श्री चिंतामणी, ओझरच्या श्री विघ्नहर, रांजणगावच्या श्री महागणपती व लेनाद्रीच्या गिरीजात्मक या देवस्थानांचे दर्शन घेतले. त्या मंदिरांतुन आणलेल्या फुला - प्रसादाचा भंडार भूमीपूजनाच्या जागेवर उधळला आणि दि. १ जानेवारी २०१५ रोजी मोठ्या थाटामाटात व उत्साहात मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन केले.* त्यावेळी आम्हाला झालेला आनंद अवर्णनीय असाच होता. माझ्या लाडक्या बाप्पाच्या मंदिराचे बांधकाम सुरू झाले होते.
बरोबर गुरुवार दि. १ जानेवारी २०१५ रोजी मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामधे येणाऱ्या गणेश जयंतीला शरद नगर मधे माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहामधे साजरा होतो. त्यामुळे २०१६ च्या फेब्रुवारी महिन्याच्या आतमधे मंदिराचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे होते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू होते. मंदिराचे बांधकाम भक्कम व दर्जेदार व्हायला हवे याकडे आमचे पूर्ण लक्ष होते.
मंदिराचे खोदकाम १२ फुटापर्यंत खोल केले आहे. एकूण ११५५ स्क्वेअर फुटाच्या मंदिराचा पाया हा १५ कॉलमचा आहे. १०"६" X १०"६" फुटाचा गाभारा आहे. तर १४" X १८" फुटाचा सभा मंडप आहे. मंदिराचा पाया जमीनीपासुन ४ फुट उंचावर आहे. तर मंदिर पूर्व - पश्चिम असे बांधले आहे. मंदिराला एकूण ८ कळस आहेत प्रमुख कळस १८ फुटांचा आहे. छोटा कळस ९ फुटांचा तर ३ फुटांचे ६ छोटे कळस आहेत. एकूण मंदिराचे बांधकाम अत्यंत काळजीपूर्वक केले गेले आहे. मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजे गुरुवार दि. ११ फेब्रुवारी २०१६ रोजी ठेवण्यात आले आणि मंदिराचे पूर्ण बांधकाम दि. ३१ डिसेंबर २०१५ रोजी पूर्ण झाले. अवघ्या वर्षभरामधे कुठलाही अडथळा न येता मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
*मंदिर बांधतानाच हे मंदिर मी स्वखर्चाने बांधणार आहे, असे ठरवले होते. मंदिराच्या बांधकामाला एकूण ११ लाख रुपये खर्च येईल, असा आमचा प्राथमिक अंदाज होता. मात्र तो वाढत गेला आणि २१ लाखांवर पोहोचला. मात्र पैशांची अडचण भासली नाही. शरद नगरचे फ्लॅट विकून जो नफा झाला तो मंदिराच्या बांधकामासाठी वापरला. बाप्पानेच पैशांची कमतरता भासु दिली नाही. त्यामुळे बांधकाम पैशांमुळे अडुन राहिले नाही. वेळेच्या आधीच बांधकाम पूर्ण झाले. मंदिरासाठी कुणाकडूनही देणगी घेतलेली नाही की मदत म्हणून काही स्विकारलेले नाही. माझ्या स्वप्नात होते तसे मंदिर मी बनवुन घेतले.*
मंदिर बांधताना अनेक शंका - कुशंका मनामधे होत्या. शेजारचेच मंदिर अपूर्ण राहिले होते. अर्धवट बांधकाम कोसलुन पडले होते. त्यामुळे मंदिराच्या बांधकामाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जात होत्या. *मंदिर हे कोणाच्याही हातुन पूर्ण होत नाही. देवाची इच्छा असली तरच ते पूर्ण होते.* नाहीतर कितीही प्रयत्न करा यश येत नाही. विविध प्रकारचे अडथळे व संकटे येतात. त्यामुळे मनामधे खुप भिती होती. मात्र बाप्पाच्या मंदिराचे काम सुरू केल्यापासून कुठल्याही प्रकारचे अडथळे आले नाहीत की कुठलेही संकट आले नाही. उलट ठरलेल्या वेळेच्या आधी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले तेही माझ्या मनासारखे.
मंदिर बांधकामावर शरद नगर मधील रहिवासी मंडळींचेही पूर्ण लक्ष होते. मंदिर जस - जसे आकाराला येत होते. तस - तसा सर्वांचाच उत्साह वाढत होता. आता तर हे मंदिर प्रसिद्ध झाल्याने शरद नगरचे रंग - रूपच पालटले आहे. माझ्यासहित सर्वांच्या मनामधे मंदिराबाबतच्या वेगवेगळ्या कल्पना
आहेत. बाप्पाच्या आशिर्वादाने त्या सर्व पूर्ण होतील अशी आशा आहे. या मंदिराचे पावित्र राखले जावे, मंदिरामधे रोज पुजा - आर्चा व्हावी. भजन - कीर्तनाची ओढ भावी पिढीला लागावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
गेली अनेक वर्ष मी पत्रकारीतेच्या क्षेत्रामधे आहे आणि तेवढीच वर्ष मी सामाजिक कार्यामधेही आहे. विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातुन अनेक स्वरूपाची सामाजिक कार्य मी सातत्याने करत असतो. सर्व सामाजिक कार्य आता मंदिराच्या माध्यमातुन करण्याचा प्रामाणिक हेतु आहे. यापुढे सर्व मंदिराची उत्तरोत्तर वाढ व्हावी. यासाठी प्रयत्न करणे, गोर - गरीब, गरजुंना मदतीचा हात देणे, शैक्षणिक उपक्रम राबवणे याबरोबरच चांगले संस्कार असणारी संस्कारक्षम पिढी निर्माण करणे, असे अनेक उपक्रम आम्ही हातामधे घेणार आहोत. *बाप्पाच्या आशिर्वादाने शरद नगरमधे राहायला आलेली सर्व रहिवासी मंडळी ही हौशी व उत्सवप्रेमी आहेत. त्यांच्यामधे एकोपा आहे. संघटितपणे काम करण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळेच बाप्पाच्या मंदिराच्या माध्यमातुन खुप काही करता येईल असे वाटते. म्हणूनच फक्त मंदिर बांधले म्हणजे झाले, असे न होता आता तर खरी सुरुवात आहे. पुढचे पूर्ण आयुष्य बापाच्याच चरणी आहे.* आता बाप्पाच आमचे सर्वकाही आहे. खुप श्रद्धेने सर्वकाही केलेय. त्याची प्रचीतीही आम्हाला आलीय, आता जे काही आहे तो बाप्पाचाच, याच भावनेने कार्यरत राहणार आहोत.
खिशामधे काहीही नसताना एक स्वप्न पाहिलं. ते स्वप्न बाप्पाच्या आशिर्वादानेच पूर्ण झालं. आजच्या घडीला मंदिरामधे रोज भाविक येतात. बाप्पा समोर उभे राहून डोळे मिटतात व शांतपणे बाप्पाचे स्मरण करतात. विनम्रपणे हात जोडून आपले स्वप्न मनातल्या मनात बाप्पाला सांगतात. त्या स्वप्नांचा प्रामाणिकपणे व मेहनतीने पाठलाग करतात आणि त्यांचे स्वप्न पूर्ण होते म्हणूनच शरद नगरच्या स्वप्नपूर्ती बाप्पाची प्रसिद्धी सर्वदूर पोहोचली आहे.
कालपर्यंत बाप्पा फक्त माझा होता आता तो सर्वांचाच झालाय. बाप्पाने जो प्रसाद आम्हाला दिलाय. जो दृष्टांत आम्हाला दिलाय, तोच सर्वांना मिळावा, सर्वांच्याच जीवनामधे सुख - शांती व समृद्धी नांदावी, सर्वांच्याच स्वप्नाची पूर्तता व्हावी, हिच प्रार्थना बाप्पाजवळ नेहमी करतोय आणि बाप्पाची सेवा मरेपर्यंत विनम्रपणे करण्याची संधी मिळावी, हिच इच्छा व्यक्त करतोय.
: शरद पाटील
