ब्लॉग

एसटी स्टँड वरचा पोरगा ते बिल्डर : एक संघर्षमय प्रवास

*एसटी स्टँडवरचा पोरगा ते*
*'शरद नगर' चा संस्थापक*

*कुछ पाने के लिए,*
*बहुत कुछ खोना,*
*पडता है !!*

"या जगामधे सर्व काही शक्य आहे, पण ते मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. अविरतपणे प्रयत्न करताना खुप काही गमवावे लागते. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. ठार बहिरे होऊन कामाला जुंपून घ्यावे लागते. अहंकार बाजुला ठेवावा लागतो आणि जे पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी लागते. मन मारून जगावे लागते आणि निश्चित ध्येयाने प्रेरीत होऊन झपाटल्यासारखे काम करावे लागते. निश्चित ध्येय्य डोळ्यासमोर ठेवून चालावे लागते," या सर्व गोष्टींची कल्पना शालेय वयातच आली होती आणि थोरा - मोठ्यांची चरीत्रे सातत्याने वाचल्याने मोठे व्हायचे असेल तर, *यशस्वी माणसांच्या पावलांवर पाऊल ठेवूनच पुढे जावे लागेल,* असे निश्चित केले होते. त्यामुळे जे काही सोसावे - भोगावे लागेल ते सोसू पण गरीबीत मरणार नाही; असा ठाम निर्धार होता.
*"गरीबीत जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, मात्र गरीबीतच मेलात तर त्याला तुम्हीच जबाबदार आहात,"* या अर्थाचे सुभाषित लहानपणापासूनच कानावर पडत होते. ते पटण्यासारखेच होते. म्हणूनच दारीद्र्यावर मात करून स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहायचे, असे शालेय वयातच ठरवले होते. इयत्ता ७ वी पिक, ता. वाडा या प्राथमिक शाळेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्यानंतर डहाणू येथील शासकीय वसतीगृहामधे प्रवेश मिळाला होता. तिथे जाताना घरून सोबत दिलेल्या मोडक्या पेटीच्या आतल्या कप्प्यावर वहीच्या कागदावर लिहून चिकटवलेले वरील सुभाषित रोज नजरेत पडत होते. मोठे होण्याचा निर्धार तेव्हापासूनच झाला होता. इयत्ता ७ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण हॉस्टेलमधे राहूनच झालं. त्यानंतर २ वर्षांचा कृषी डिप्लोमा कोसबाड हॉस्टेलमधे राहूनच पूर्ण केला. त्यानंतर गावी पिक येथे आलो. गरीबी पाचवीला पुजलेली होती. त्यामुळे माझ्याकडून घरच्यांच्या खूप सार्‍या अपेक्षा होत्या. त्यावेळी कृषी कोर्स केल्यानंतर कृषी सेवक, ग्रामसेवक वा इतर नोकऱ्या मिळत होत्या. माझ्या वर्गातील मुलं नोकरीसाठी प्रयत्न करत होती. काहींना नोकऱ्या मिळाल्याही होत्या. मी मात्र नोकरी करणार नाही, असे घरात सांगितल्यानंतर सर्वजण वैतागले. खरं तर, मी नोकरीला लागेन व घरची परीस्थीती सुधारेल, या आशेवर सर्वजण होते. पण नोकरीला नकार देताच घरात वाद सुरू झाले. मग घर सोडायचे ठरवले.
मला नोकरीमधे अडकणे परवडणारं नव्हते. नोकरी करायची अजीबात इच्छा नव्हती. नोकरी म्हणजे काय ? याचा पूर्ण अभ्यास केला होता. *म्हणूनच व्यवसायाला सुरुवात करायची आणि नाही जमले तर तिन वर्षांनी म्हणजे सुमारे १००० दिवसांनी नोकरीकडे वळायचे, असे ठरवले होते. म्हणूनच पिक गावातून निघताना घरातून काहीही न घेता अंगावरच्या कपड्यांनिशी बाहेर पडलो.* हातामधे कृषी डिप्लोमाला जाताना घरातून दिलेली दोन जर्मनची टोपं व एक ताट तेही जर्मनचेच एक कापडी पिशवीमधे टाकले होते. पिक गावामधे त्यावेळी एसटी येत नव्हती. म्हणून जंगलातील डाहे फाटा या मधल्या रस्त्याने चालत येऊन वाडा शहर गाठले. कुठे जायचे ? काय करायचे ? काही ठरलेलं नव्हते. फक्त 'पडेल ते काम' करायची तयारी होती. वाडा एसटी स्टॅंडवर पोहोचताच हातातील कापडी पिशवी स्टॅंडवरील बसण्याच्या लाकडी फळ्यांखाली ठेवली आणि शहरात फेरफटका मारला.
व्यवसायात उतरायचे तर शहरातील मोठ्या व्यवसायीकाकडेच कामाला लागायचे, तरच अनुभव मिळेल म्हणून मोठ्या व्यापाऱ्यांकडे लक्ष ठेवून होतो. पूर्ण शहर फिरुन झाल्यानंतर पुन्हा स्टॅंडवर आलो. एसटी स्टॅंड शेजारीच 'विकास वाईन्स' नावाचे दारूचे दुकान होते आणि या दुकानासमोर एका भैय्याची केळ्याची गाडी होती. दोघे म्हातारे नवरा - बायको केळी विकत होते. त्यांच्याकडे जाऊन थेट विचारले, 'काम मिळेल का ? मी तुमच्या जोडीला केळी विकेन.' त्यांना आश्चर्य वाटले पण त्यांनी होकार दिला. 'चलेगा, हिसाब संभाल,' असे म्हणून त्यांनी मला त्यांच्यासोबत उभे केले. अनुभव नवा आणि पहिलाच होता. पण सुरुवातीला पोटापाण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. पैसे नाही मिळाले तरी केळी खायला मिळतील. भूक भागेल, असा विचार त्यामागचा होता.
पहिलाच दिवस संपला होता. राहायचं कुठे ? हा प्रश्न होताच. म्हणून पुन्हा स्टॅंडवर गेलो. शेवटची एसटी गेल्यानंतर रात्री स्टॅंड सामसुम झाले. स्टॅंडवरच्या शौचालयातच फ्रेश झालो आणि स्टॅंडवरच्या फळ्यांवरच झोपलो. सकाळची पहिली ५ ची एसटी आली तेव्हा उठून पुन्हा त्याच शौचालयात जाऊन कशी - बशी अंघोळ उरकली आणि स्टॅंडपासून जवळच असलेल्या 'विकास टी हाऊस' मधे चहा प्यायला गेलो. तिथे त्या हॉटेलचे मालक विकास कुशाभाऊ ठाकरे हेच गल्ल्यावर होते. त्यांनी, "तु ऐनशेतवाल्यांचा भाचा ना ? कृषी कोर्स केला आहेस ना ? मग त्या भैय्याकडे केळ्यांच्या गाडीवर काय करतोस ?" असे विचारून मी काही बोलायच्या आतच त्याने हॉटेल समोरील किराणा दुकानाकडे बोट दाखवून, "मिलनला कृषीचे दुकान टाकायचे आहे. तो खते - औषधे विकतो. तुझी तयारी असेल तर बोल, मी बोलतो त्याच्याशी." असे म्हणताच मी तत्काळ होकार दिला. *"अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने मे लग जाती है,"* याचा प्रत्यय मला येत होता.
विकास ठाकरे हे मला घेऊन 'मधुकर सखाराम पातकर' यांच्या किराणा दुकानात गेले. तेथे मिलन पातकर यांच्याशी ओळख करून दिली आणि, "याने कृषी कोर्स केलाय. हुशार आहे. तुला माणूस पाहिजे होता ना. ठेव याला," असे सांगितले. मिलननेही तत्काळ होकार दिला. एका लाकडी कपाटात ठेवलेली कृषीची औषधे दाखवली आणि खताचे गोडाऊन दाखवून दुसऱ्या दिवसापासून यायला सांगितले. खुप बरं वाटलं. एक तर तो व्यापारी मोठा होता. व्यवसायाचा अनुभव मिळेल आणि ज्या कृषी चा अभ्यास केला तेच काम मिळाले याचा आनंद झाला. मिलन पातकर आणि त्यांच्या वडिलांची भेट घेऊन पुन्हा केळीच्या गाडीवर आलो. संध्याकाळपर्यंत काम केलं, त्यांना उद्यापासून येणार नाही, म्हणून सांगितले आणि पुन्हा एसटी स्टॅंड गाठले.
काल रात्रभर एसटी स्टॅंडवर झोपलेला पोरगा आज पुन्हा आलाय हे पाहिल्यावर तेथील कंट्रोलर रामचंद्र पटारे (मोज) यांनी मला तेथून हाकलले आणि, 'ही काय झोपायची जागा आहे का ?' असे बरेच काही बोलून दम भरला. मी तेथून निघालो. शहर फिरलो. कंट्रोलर झोपायची वाट पाहिली आणि ते झोपले आहेत असे पाहून स्टॅंडवरच्या फळ्यांवर न झोपता फळ्यांखाली झोपलो. सकाळी पहिली गाडी यायच्या आत उठून फ्रेश होऊन पातकरांचे दुकान उघडण्याच्या आत त्यांच्या दुकानासमोर जाऊन उभा राहिलो. दुकान उघडताच कामाला सुरुवात केली ती दुकानात साफसफाई करायला. ते किराणा मालाचे मोठे दुकान होते. कामगारही बरेच होते. माझ्याकडे औषधे व खते विकण्याचे काम होते, पण ग्राहक नसताना मी किराणा दुकानामधे काम करायचो. त्या दुकानात सामानाच्या पुड्या बांधताना मला अनेकांनी पाहिले आहे. त्यामुळे आजही माझ्यावर टिका करताना विरोधक 'किराणा मालाच्या दुकानात पुड्या बांधणारा, एवढा मोठा कसा झाला ? एवढा पैसा कुठून आला ? असे विचारतात. काहीजण तर हा हमाली करायचा, याच्याकडे एवढा पैसा कसा आला ? असेही विचारतात.
मी कामाला लागल्यानंतर मिलन पातकर यांनी दुकानाच्या एका छोट्याशा कोपऱ्यात शेतीची औषधे विकण्याचे एक नवे दालन सुरू केले, पातकर फर्टीलायझर्स या नावाने. या दुकानाचा प्रचार - प्रसार करण्यासाठी मी जीवाचं अक्षरशः रान केलं. गावा - गावात जाऊन पायी फिरून दुकानाचा प्रचार करणारी पत्रके वाटली. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन रोगांवरील औषधांची माहिती देऊन औषधे विकली. कुठलेही काम मेहनतीने व प्रामाणिकपणे करण्याची तयारी होती. सिझनमधे खताची विक्री मोठ्या प्रमाणावर व्हायची. 'पातकर फर्टीलायझर्स' चा मी एकमेव कर्मचारी असल्याने शेतकरी खत घेण्यासाठी आल्यानंतर पावती बनवायची, पैसे घ्यायचे आणि शेतकऱ्याने सोबत आणलेल्या हामालाच्या डोक्यावर खताच्या गोणी उचलून द्यायच्या, हे माझे रोजचे काम. मला खताच्या गोणी हामालांच्या डोक्यावर उचलून देताना सर्वजण पाहत होते. त्यामुळे नव्याने येणाऱ्या प्रत्येकालाच मीही हमालीच करतोय, असे वाटत होते. बोलणाऱ्यांची संख्या वाढत होती. *कधी लोकं मला दुकान साफ करताना, दुकानात झाडू मारताना, कधी सामनाच्या पुड्या बांधताना तर कधी खताच्या गोणी हामालांच्या डोक्यावर उचलून देताना पाहत होते. ज्यांनी मला ज्या रूपात पाहिले तेच त्यांच्या लक्षात राहिले.* मी मात्र अनुभव घेत होतो. वर जाण्याची 'शिडी' शोधत होतो. हे सर्व करताना लिखाण काम सुरूच होते. म्हणजे पत्रकार म्हणून मी काम करतच होतो.
दुकानात काम मिळाल्याने आणि दुकान स्टॅंडजवळ असल्याने लोकांशी संपर्क वाढला होता. पत्रकारीता हाच माझा मोठा आधार होता. पत्रकारीतेमुळेच मला मोठे होता येणार होते. त्यासाठी मी मार्ग तयार करत होतो. स्टॅंडवर कंट्रोलर झोपू देत नव्हते आणि शौचालयात अंघोळ करणे असाह्य झाले होते. पुन्हा एकदा देवाला दया आली. बरोबर नवव्या दिवशी एसटी स्टॅंडवर मी हामालांच्या बरोबर एसटीच्या टपावर गोणी चढवून द्यायला गेलो असताना उभा होतो. तेथे माझे मामा भेटले. स्व. विष्णू ठाकरे मामा. त्यांनी माझी विचारपूस केली. मी त्यांना, 'नोकरी करतोय, पत्रकार फर्टीलायझर्स मधे,' असे सांगितले. कुठे राहतोस ? विचारल्यावर मित्राकडे, असे ठोकून दिले. त्यांनी बहुदा ओळखलं असेल किंवा त्यांना माहित झालं असेल. त्यांनी सांगितलं की, "ऐनशेत ला रहा. जाऊन - येऊन कर." पडत्या फळाची आज्ञा मानून होकार दिला आणि एसटी स्टॅंडवरचे 'बिऱ्हाड' हालवलं. थेट ऐनशेत गाठले. राहायची सोय झाली होती. *ज्याच्याकडे राहायची सोय असते तो काहीही करू शकतो, हे अनेक थोरा - मोठ्यांनी दाखवून दिलं होतं. मीही हात - पाय मारायच्या तयारीत होतो.*
व्यापाऱ्याच्या दुकानामधे काम करण्याचा अनुभव होता. त्या बळावर छोटासा का होईना पण व्यवसाय सुरू करावा. असे ठरवले आणि वाडा एसटी स्टॅंड जवळ असलेल्या एका टपरीवर अंडी व चिकन विक्री सुरू केली. तिथेच अनेक सिझनेबल धंदे सुरू केले. दिवाळीला ग्रीटिंग्ज, आकाश कंदील, रांगोळ्या विकायचो. रक्षाबंधनला राख्यांचे दुकान टाकायचो. प्रत्येक सणाला नवीन व्यवसाय. ते करताना पत्रकारीता सुरूच होती. सकाळी कॉलेजला जाणेही सुरू होते. एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करत होतो. आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देत होतो. बरोबर तिन वर्ष उलटायला आली होती. 'रस्त्यावरचा व्यवसाय' करून त्यातच अडकून पडण्यासारखी परीस्थीती निर्माण झाली होती. घरच्यांच्या दृष्टीने, नातेवाईकांच्या नजरेतून हास्यास्पद ठरलो होतो. सरकारी नोकरी मिळत असताना केली नव्हती. त्यावेळी नोकरी करणार नाही म्हणत एक छोटीशी नोकरी पत्करली होती. त्यानंतर स्टॅंडवर छोट्या - छोट्या गोष्टी विकत होतो. हातात काहीही नसतानाही श्रीमंतीच्या बाता मारल्या होत्या, त्यामुळे जे नोकरीला लागले होते, ते चांगला पगार घेऊन जाता - येता हिणवत होते. पण मी धीर सोडला नव्हता. योग्य वेळेची, योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य संधीची वाट पाहात होतो.
छोट्या - मोठ्या व्यवसायाबरोबरच पत्रकारीतेमधेही नावलौकिक वाढला होता. सलग तिन - चार वर्ष एसटी स्टॅंडवरच घालवल्याने ओळखी वाढल्या होत्या. त्याचाच फायदा घेत 'उड्डाण भरायचं' ठरवलं आणि *१९९४ मधे वयाच्या २३ व्या वर्षी स्वतःच वृत्तपत्र 'शब्द मशाल' या नावाने सुरू केले. वाडा शहरात येताना पिक येथून चालत आलो होतो. दि ८ मे १९९४ ला त्याच शहरात एका दिमाखदार सोहळ्यामधे 'शब्द मशाल' हे वृत्तपत्र सुरू केले आणि एकाच दिवसात बोलणाऱ्यांची तोंड बंद झाली.* एका छोट्याशा शिंदे चालीतील रूममधे कार्यालय काढून सुरू केलेलं *'शब्द मशाल'* हे वृत्तपत्र अनुभवाच्या जोरावर घरा - घरात पोहोचलं व त्याच आधारावर नव- नवीन व्यवसाय चांगल्या पद्धतीने करायला सुरुवात केली.
वाडा शहरामधे आल्यानंतर विश्वास कमावला होता. हा मुलगा प्रामाणिक आहे, मेहनती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धाडसी आहे, असं सर्वांना वाटत होते. त्यामुळे पत्रकारीतेमधे बऱ्यापैकी जम बसला. तेव्हा केलेला संघर्ष आज फळाला आला असला तरीही त्यावेळी ज्यांनी मला ज्या - ज्या अवस्थेमधे पाहिलं त्या अवस्थेतील *'शरद पाटील'* चे वर्णन ते आजही करतात. विशेषत : विरोधक, टिकाकार *आज जरी मी कुठल्याही पदावर असलो तरीही, त्याच्याकडे काय होतं ? हा हमाली करत होता. किराणा दुकानामधे पुड्या बांधीत होता. रस्त्यावर कटलरी विकत होता, तरीही हा बिल्डर कसा झाला ? याचे एवढे धंदे कसे उभे राहिले ? एवढा पैसा कुठून आला ? असे प्रश्न विचारतात तेव्हा खुप बरं वाटते. मी श्रीमंत घरात जन्माला आलेलो नव्हतो तर मी प्रचंड गरीबीतून आलोय, याची जाणीव होते.* मी जे काही मिळवले ते शून्यातून मिळवलं, याचा अभिमान वाटतो. त्यामुळे मी टीकाकरांना उत्तर देत नाही, तर ते खरंच बोलतात, असे सांगून त्यांना धन्यवाद देतो.
दि. ८ मे १९९४ रोजी *'शब्द मशाल'* हे स्वतःच्या मालकीचे वृत्तपत्र सुरू केल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटाला अंगा - खांद्यावर खेळवत पुढे जात राहिलो. कुठल्याही प्रसंगाने थांबलो नाही. प्रत्येकाच्याच मनामध्ये एक 'हिडन अजेंडा' असतो. सुप्त हेतू, वा उद्देश तो अंत: करणामधे बाळगून असतो. तो इतरांना दिसून येत नाही, मात्र त्या दृष्टीने त्याची पावलं बरोबर पडत असतात. मी माझा हेतू गरीबीवर मात करण्याचा जाहीर बोलून दाखवत होतो, मात्र नेमकं काय करायचं हे सांगत नव्हतो. जेव्हा संधी मिळाली तेव्हा स्वप्न जाहीर केलं आणि स्वतःच्या मोठ्या व्यवसायांचा पसारा वाढवला. त्यातीलच एक स्वप्न होते, वाडा शहरामधे स्वतःच्या नावाचं नगर उभारायचं. *१९९० पासून स्वप्न पाहत होतो. त्यासाठी बिल्डर व्यवसायामधे २००० साली उतरलो पण प्रत्यक्षात शरद नगरच्या उभारणीस २०११ मधे सुरुवात केली. १९९० ते २०११ हा तब्बल २१ वर्षांचा कालावधी, फक्त स्वतःला घडवण्यात गेला. त्यानंतरची १४ वर्ष पाहिलेलं स्वप्न साकारण्यात गेली. तेव्हा कुठे २०२५ ला शरद नगर खऱ्या अर्थाने नावारूपाला आलं आणि मला तब्बल ३५ वर्षानंतर शरद नगरचा संस्थापक हा बहुमान मिळाला.*
या ३५ वर्षांमधे जे काही अनुभवलं, भोगलं ते प्रचंड होतं. मात्र डगमगलो नाही. मागे फिरलो नाही की मागे वळून पाहिलं नाही. माझी कुणाशीच स्पर्धा नव्हती.फक्त स्वतःला सिद्ध करण्याची धडपड सुरू होती. त्यामुळे जे - जे घडतेय त्याला सामोरे गेलो. गमावण्या सारखं काहीच नव्हते. पिक वरून येताना दोन टोपं आणि एक ताट तेही जर्मनचे घेऊन आलो होतो. त्या व्यतिरीक्त कुठलचं भांडवल नव्हतं. म्हणून भीती कधीच वाटली नाही. त्या बळावरच शरद नगरची पायाभरणी झाली. शून्यातून स्वतःची ओळख निर्माण केली. गरीबीवर मात करायचे स्वप्न होते. गरीबीतच मरायचं नव्हतं. खूप श्रीमंत झालो नव्हतो पण गरीबही राहिलो नव्हतो. त्यामुळे तेही स्वप्न पूर्ण झाले. एस. टी. स्टॅंडवरच्या ज्या शौचालयात ९ दिवस अंघोळ करायचो, *त्याच शौचालयाच्या बाजूला असलेल्या इमारतीमधील वाडा सेवा सहकारी सोसायटीचा आज मी चेअरमन आहे. २४ गावांचे प्रतिनिधित्व करतोय. ज्या बिल्डरांकडे मजूर म्हणून काम केले त्याच बिल्डर असोशियनचा अध्यक्ष आहे आणि शहरामधे आलो तेव्हा स्वतःला झोपण्यापूरतीही जागा मिळाली नव्हती, मात्र आज शेकडो लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.*
हे यासाठी सांगतोय की, शरद नगर सहज उभे राहिलेले नाही. यामधे प्रचंड परिश्रम, त्याग, समर्पण आणि बरेच काही आहे. म्हणूनच प्रत्येक ग्राहकाची मला जाणीव आहे. नगरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या प्रति आदराची भावना आहे. 'शरद नगर' हे माझं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद आहे. आपल्या खिशामधे एकही रुपया नसताना एक भले मोठे स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणे ज्याला जमत तोच ते स्वप्न पूर्ण करू शकतो. मात्र त्यासाठी 'वाट्टेल ते' आणि 'पडेल ते' काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे.
सुरुवातीला लोकं नाव ठेवीत होती, तीच लोक आता मोठ्या आदराने नाव घेतात. खताच्या गोणी उचलताना ओळख दाखवायला जी लोकं तयार होत नव्हती तीच आता दूर - दूरची नाती सांगून शरद पाटील आमचे नातेवाईक आहेत, असे अभिमानाने सांगतात. पूर्णतः परीस्थीती पालटून टाकायची धमक ठेवली आणि म्हणूनच यश मिळत गेलं. ज्यांनी जे सांगितले ते - ते मी मान्य केले. आरोपांना उत्तर देत बसलो नाही. त्यांच्या नादाला लागून वेळ घालवला नाही. त्यांना प्रत्यक्ष कृतीमधून उत्तर दिले. आजही, *'शरद पाटील' कोण होता, मला माहित आहे ?'* असे सांगणारे अनेक आहेत, त्यांनी सांगण्यापेक्षा मीच माझ्या लिखाणातुन, भाषणांमधुन अनेक वेळा सांगितले की,"मी रस्त्यावरचा पोरगा होतो. *मी शून्य होतो, माझ्याकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं," पण तेच माझं खरं भांडवल होतं.*

*" ये फुल विरासत मे*
*नही मिले है मुझे,*
*किसीने मेरा काॅंटो*
*भरा बिस्तर नही देखा !!"*•

*• शरद यशवंत पाटील*
*संस्थापक, शरद नगर,*
*वाडा, जि. पालघर.*
*( M) 8600001111*