ब्लॉग

शरद नगर : स्वस्त घर - मस्त घर

गरीबांच्या स्वप्नातील

घर : शरद नगर

       वयात येणाऱ्या प्रत्येकाचचं *'स्वतःचं स्वतंत्र घर असावं'* असं एक स्वप्न असतं. त्या स्वप्नाच्या मागे सर्वजण पळत असतात. रात्रं - दिवस कष्ट करत असतात. अनेकांची स्वप्न पूर्ण होतात तर काहींची स्वप्न अपूर्णच राहतात. गरीबीमधे जन्माला आलेल्यांना मात्र घराचं स्वप्न पाहात - पाहात ताटकळत राहावं लागतं. खुप परीश्रम करावे लागतात. *बिल्डर गरीबांना कुठलेच सहकार्य करायला तयार नसतात. त्यामुळे त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची अक्षरशः माती होते.* तर काहींना हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची घालावं लागतं.

       मी प्रचंड गरीबीमधुन आलोय. दारीद्र्य वयाच्या १७ वर्षापर्यंत अनुभवलयं. *गरीबी खुप वाईट असते. गरीबाचं कुणीही नसतं, हेही त्यावेळी उमगलंय.* वाडा तालुक्यातील पिक या छोट्याशा खेडेगावातील एका झोपडीमधे माझं बालपण गेलं. वडिलांच्या आजारपणामुळं आईने अक्षरशः इतरांच्या शेतावर मजुरकरासारखं काम करून आम्हाला वाढवलं. डहाणूतील शासकीय वस्तीगृहामधे शालेय शिक्षण झालं. कोसबाड येथे दोन वर्षाचा कृषी कोर्स केला. त्यानंतर पुन्हा गावामधे आलो तो एक भलं मोठ्ठं स्वप्न घेऊन *'गरीबीमधे जन्माला आलो तरी गरीबीमधे मरणार नाही,'* हे शालेय वयातच मनावर बिंबवलं होतं. त्यामुळे कितीही परीश्रम करायची तयारी होती. म्हणून गाव सोडला. 

       वाडा शहरात आलो तो नेसत्या वस्त्रानिशी. खिशात नया पैसाही नव्हता. एसटी स्टँडवर झोपलो, नंतर मामाकडे ऐनशेतला राहायला गेलो. खाजगी नोकरी करत पुन्हा वाड्यात राहायला आलो तो एका छोट्याशा चाळीत. पातकर गॅस एजन्सीजवळ एक शिंदे चाळ होती. त्या चाळीतील एका १०० स्क्वेअर फुटाच्या रूममधे राहायला लागलो. तिथुनच १९९४ मधे *'शब्दमशाल'* हे वृत्तपत्र सुरू केलं. १९९६ मधे पिक कॉलनी मधील कोटाच्या चाळीत ३०० स्क्वेअर फुटाची रुम भाड्याने घेऊन तिथे राहायला गेलो. या छोट्याशा चाळीमधेही ८ वर्ष काढली. त्यानंतर २००४ मधे ५०० स्क्वेअर फुटाचा 1BHK फ्लॅट विठ्ठल मंदिराजवळील एका बिल्डींगमधे घेतला. मग तिथे राहायला गेलो. दोन वर्षानंतर तिथेच दुसरा एक फ्लॅट घेऊन पहिल्या मजल्यावर *'शब्द मशाल'* वृत्तपत्राचं कार्यालय सुरू केलं. 

       *पिक गावातील झोपडी, चाळ ते फ्लॅट पर्यंतचा प्रवास करायला १९९० ते २००४ असा चक्क १४ वर्षांचा काळावधी लागला. या १४ वर्षांच्या प्रवासात खुप सोसलं, खुप भोगलं. अनेक अनुभव आले.* १४ वर्ष फक्त फ्लॅटच स्वप्न पाहत राहिलो. फ्लॅटमधे राहायला आल्यावर कळलं की, चालीतील संस्कृती आणि फ्लॅटमधील संस्कृती यामधे जमीन - अस्मानाचा फरक आहे. चाळीमधे एक सारखीच गरीब लोकं राहतात. त्यामुळे प्रगती खुंटते. स्पर्धा थांबते. *चाळीतील जीवन नकोसं वाटतं. अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. नको ते कानावर पडतं. म्हणूनच प्रत्येकाला चाळीतुन फ्लॅटमधे यावसं वाटतं.* पण ते बऱ्याचदा शक्य होत नाही. 

       १४ वर्षांचे चाळीतील अनुभव लक्षात घेऊनच ज्याची फ्लॅट घ्यायची इच्छा आहे, त्याला फ्लॅट घेता आला पाहिजे, असा मनाशी निर्धार करून एक स्वप्न पाहिलं, स्वतःच्या नावाचं नगर उभारायचं, तिथे गरीबातल्या गरीब माणसाला आणि श्रीमंत - धनाढ्य इसमांनाही फ्लॅट घेता आला पाहिजे. गरीब - श्रीमंत एकत्र राहिले पाहिजेत तरच गरीबांचेही विचार बदलतील. *गरीबांची मुलं जेव्हा श्रीमंत मुलांच्या सोबत वावरतील, खेळतील तेव्हाच तीही श्रीमंताप्रमाणे वागायला लागतील. स्पर्धा करायला शिकतील.* मात्र श्रीमंतांना गरीबांची सोबत नको असते. गरीबांचा शेजार श्रीमंतांना आवडत नाही. श्रीमंत लोकं श्रीमंत वस्तीमधे घर घेतात. तर गरीब गरीबांच्या वस्तीमधेच नाईलाजास्तव राहायला जातात. बिल्डरही फ्लॅटची रचना करताना श्रीमंतांसाठी 2 BHK, 3 BHK तर गरीबांसाठी 1 RK, 1BHK अशी रचना करून तशा स्वतंत्र बिल्डींग बांधतात. मला हे सतत खटकट होतं. गरीब व श्रीमंत हे एकत्रच, एकाच बिल्डींगमधे राहायला हवेत. असं वाटत होतं. म्हणूनच माझ्या नगराची रचना करताना 1 RK, 1 BHK, 2 BHK व 3 BHK एकाच मजल्यावर येतील अशी केली. 1 RK हा फ्लॅट अवघा ३१० स्क्वेअर फुटाचा व ३ लाख रुपयांपर्यंत विकता येईल या मापाचा ठेवला. पहिल्या राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स या बिल्डींगमधे हा प्रयोग यशस्वी झाला. या बिल्डींगमधे गरीबातल्या गरीब ग्राहकांनी व श्रीमंत ग्राहकांनीही फ्लॅट घेतले. *शासकीय कार्यालयामधे काम करणारा शिपाई व अधिकारी एकाच मजल्यावर राहायला लागले.* त्यांची मुलं एकत्र खेळायला - वावरायला लागली. गरीब - श्रीमंत ही दरी कमी झाली. 

       शरद नगर उभारतानाच या नगरामधे कुठलाही जातीभेद, धर्मभेद वा इतर कुठलाही भेद पाळला जाणार नाही. सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतील. एकमेकांशी सन्मानाने वागतील असा नियम बनवला. फ्लॅट घेतानाच तशा सुचना दिल्या. *'आम्ही संस्कृती जपतो - आम्ही परंपरा पाळतो'* या घोषवाक्याखाली सर्वांना एकत्र आणलं आणि सर्व सण - उत्सव साजरे करायला सुरुवात केली. त्यामुळे सर्वांची मनं जुळली. एकोपा वाढला. इतर कुठेही जे वातावरण दिसत नव्हतं ते शरद नगर मधे पहिल्या दिवसापासुन दिसायला सुरुवात झाली. *या नगरामधे मुस्लीम समाजाचे अधिकार राहायला आले. आयुब तांबोली हे वाडा तहसिल कार्यालयामधे नायब तहसिलदार पदावर होते.* त्यांना आम्ही आमच्या नगराचे नियम समजावून सांगितले त्यांना ते पटले. ते आमच्या नवरात्रौत्सव मंडळामधे पदाधिकारी झाले. *नवरात्रीमधे नऊ दिवस ते मंदिरातील आरतीमधे सहभागी झाले. एक मुस्लीम समाजाचा व्यक्ती शरद नगरमधे देवीची आरती करतो, हे पाहुन सुरुवातीला खळबळ माजली.* मात्र शरद नगरचा विषय असल्याने कुणीही तोंड उघडलं नाही. उलट सर्वत्र कौतुक झालं. 

       आता शरद नगरमधे एक मुस्लीम कुटूंब राहतोय. फारुख शेख यांचे. तेही नवरात्रीमधे सहकुटूंब देवीचे आरती करतात. शरद नगरमधे प्रवेशद्वारातच स्वप्नपूर्ती गणपती बाप्पाचे मंदिर आहे. या मंदिरामधे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामधे ते सहभागी होतात. *त्यांना तीन मुली आहेत, त्याही हिंदूंच्या सर्व सणांमधे सहभागी होतात. गरबा खेळतात.* मंदिरामधे साजरा होणाऱ्या रक्षाबंधन, भाऊबीज व अन्य कार्यक्रमामधे आनंदाने सहभागी होतात. 

       हे मुस्लीम कुटूंबीय रहायला आले त्यावेळी मंदिरामधे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा होत होता. मंदिरामधे बाप्पाच्या मूर्तीसमोर खुर्चीवर बसलो होतो आणि नगरातील महिला मला राखी बांधत होत्या. हे पाहून *नेहा फारुख शेख याही राखी घेऊन आल्या. मी मंदिरातुन उठून खाली जायला लागलो, त्यावेळी नेहा शेख यांनी सांगितले की, "मीच येते. इतर महिला ज्या ठिकाणी राखी बांधतात. तेथेच मी राखी बांधेन."* त्या आल्या आणि स्वप्नपूर्ती गणपती बाप्पा समोर माझ्या हाताला राखी बांधली. 

       *एका मुस्लीम महिलेने गणपती मंदिरामधे माझ्या हाताला राखी बांधून शरद नगरची परंपरा जपली.* मी दरवर्षी शरद नगर मधील सर्व महिलांना पहिल्या वर्षापासुन भाऊबीज करतो. गेल्या १४ वर्षामधे त्यात कधिही खंड पडलेला नाही. दरवर्षी भाऊबीजेचा कार्यक्रम मंदिरामधेच साजरा होतो. त्यामधे नेहा शेख याही आनंदाने सहभागी होतात. मी ही दरवर्षी त्यांना भाऊबीज करतो. हे एक वेगळ आदर्श उदाहरण शरद नगर मधे पाहायला मिळते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. 

       कुठल्याही जातीचा वा धर्माचा भेद या नगरामधे केला जात नाही. सर्वजण आपल्या जातीची - धर्माची संस्कृती - परंपरा पाळतातच पण नगरातील सर्व सण - उत्सवांमधे कुठलाही भेद न पाळता सहभागी होतात, हे या नगराचे खरे वैशिष्ट्य आहे. *गरीब - श्रीमंत ही दरी आम्ही संपवली आहे. त्यामुळे गरीब लोकंही सन्मानाने या नगरामधे वावरतात. प्रतिष्ठेच व सन्मानाचं जीवन जगतात. एकोपा राखुन आनंदी जीवन राहतात.* शरद नगर मधील एकोपा तर वाखानण्याजोगा आहे. कुणा एकावर संकट आलं, दुःखद प्रसंग घडला तर पूर्ण नगर त्याच्या पाठीशी सर्व ताकतीने खंबीरपणे पाठीशी उभं राहतं. नुकताच एका महिलेचे आजारपण अचानक वाढले. दवाखान्याचा खर्च जास्त होता. नगरातील सर्वांनी वर्गणी कढुन त्यांना मदत केली. प्रत्येकाच्या सुख - दुःखामधे सर्व नगरवासीय सहभागी होतात. एवढं चांगलं वातावरण इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही. 

       शरद नगर मधील सर्व नगरवासीय एकत्र येऊन एक रहिवासी मंडळ स्थापन केले आहे. महिलांचे जय जिजाऊ महिला मंडळ आहे. तर तरुण मुलांचे युवक मंडळ आहे. प्रत्येक सण - उत्सवाच्या वेळी एक वेगळी कार्यकारीणी एकमताने निवडली जाते. प्रत्येक फ्लॅट मधुन वर्गणी जमा करून कार्यक्रम साजरे केले जातात. नगरामधे सर्वजण समान पातळीवर असतात. कुणी मोठा नाही, की कुणी छोटा नाही. सर्वांना समान अधिकार. 

       मी स्वतः माझ्या कुटूंबीयांसह सर्व कार्यक्रमांमधे उत्साहाने सहभागी होतो. रोज संध्याकाळी नगरामधे राऊंड मारतो. समस्या - अडचणी जाणून घेतो. माझे आणि नगरवासीयांचे अत्यंत सलोख्याचे व जिव्हाल्याचे संबंध निर्माण झाले आहेत. नगरात प्रवेश करताच आम्ही नगरवासीयांपैकीच एक होऊन जातो. त्यांच्यात रमतो. एक बिल्डर व रहिवासी असे न वागता त्यांच्या घरातल्या सदस्या प्रमाणेच आमचे वागणे असते. त्यामुळे प्रत्येकाशी घरच्यांप्रमाणे संबंध आहेत. मी मला हवं तसं नवराला रूप दिलं आहे. जे - जे करायला हवं ते - ते कुठेही हात आखडता न घेता खुळा दिलाने केलं आहे. रहिवाशांना कुठलीही अडचण भासु नये, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. 

       शरद नगरमधे पूर्ण देशातील प्रत्येक राज्यातील नागरीक आनंदाने राहतात. वेगवेगळ्या जिल्ह्यातील, राज्यातील लोकं कशी एकरुप होऊन वागतात, हे पाहायचे असेल तर शरद नगर हे उत्तम उदाहरण आहे. नगरामधे रहायला येणारी सर्व रहिवासी मंडळी सुसंस्कृत व प्रतिष्ठीतपणा जपतात. त्यामुळे शरद नगर ही शहरातील एक चांगली वस्ती निर्माण झाली आहे. कुणालाही चांगल्याच वस्तीमधे रहायला आवडतं. चांगल्या लोकांच्या सहवासामधेच प्रगती होते. म्हणूनच कायमस्वरूपी वास्तव करू इच्छिणारी लोकं शरद नगरमधेच फ्लॅट घेतात. फ्लॅट विकत घेणाऱ्या प्रत्येकाशी आमचं एक वेगळं नातं निर्माण झालेले आहे. त्यांचा व्यक्तीश: माझ्यावर विश्वास बसला आहे. मी अगदी सुरुवातीपासुनच या नगराची जाहिरात करताना स्वतःचा फोटो व स्वतःचे मोबाईल क्रमांक देऊन करतो आहे. प्रत्येक ग्राहकाशी मी स्वतः बोलतो, स्वतः व्यवहार करतो, प्रत्येकाला भेटतो. त्यांच्या समस्या जाणून घेतो, वेळप्रसंगी मदतही करतो, असं कुठल्याही बिल्डच्या बाबतीमधे घडत नाही. कारण बिल्डर कधीही ग्राहकांसमोर येत नाही. तो फ्लॅट विक्रीसाठी पगारी नोकर ठेवतो. हे नोकरच ग्राहकांशी बोलतात. व्यवहार करतात. बिल्डर कधीतरी ग्राहकांच्या समोर येतो. त्याचा खरेदी - विक्रीमधे फारसा सहभाग नसल्याने तो कुठल्याच गोष्टीला जबाबदार नसतो. त्याचा संबंध फक्त पैशांशी. पैसे घेतले की तो मोकळा होतो.

       एकदा का बिल्डींग बांधून झाली, फ्लॅटचा ताबा दिला की, त्याचा संबंध रहिवाशी मंडळीशी संपतो. आम्ही मात्र ग्राहक फ्लॅट खरेदी करायला आल्यापासून त्यांच्याशी जोडले जातो. सतत त्यांच्याशी संपर्क ठेवतो. त्यांच्या सुख - दुःखामधे सहभागी होतो. नगराची व त्यांना विकलेल्या प्रत्येक फ्लॅटची जबाबदारी घेतो. आमच्याकडून कुणाचीही फसवणूक होणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतो. त्यामुळे आमच्याकडून आजपर्यंत कुणाचीही फसवणूक झालेली नाही. दिलेला प्रत्येक शब्द तंतोतंत पाळला आहे. म्हणूनच बिल्डर व रहिवाशी यांचं एक वेगळं नाते निर्माण झाले आहे. योजनाबद्ध पद्धतीने निर्माण केलेलं शरद नगर हे पहिलं गृहसंकुल ठरलं आहे. म्हणूनच गरीबातल्या गरीब माणसापासून ते श्रीमंत माणसापर्यंत कुणालाही फ्लॅट घ्यायचा असेल तर तो पहिली पसंत शरद नगरलाच देतो. 

       ज्यांच्याकडे खरंच फ्लॅटची बुकींग करायला पैसे नव्हते, ते आता या नगरामधे फ्लॅटचे मालक झालेले आहे. छोटा का होईना पण स्वतःच्या हक्काचा फ्लॅट त्यांनी घेतला आहे. पेट्रोल पंपावर काम करणारा शैलेश सिंग, डोक्यावर भांडे घेऊन गावोगावी फिरणारी पवार मावशी, रस्त्यावर बसुन छोट्या - छोट्या वस्ता विकणारी गोसावी काकी, कंपनीमधे तुटपुंजा पगारावर काम करणारे कामगार आणि टपरी चालवणाऱ्या टपरी मालकांनीही शरद नगर मधे फ्लॅट घेतले आहेत. या छोट्या लोकांबरोबर गर्भ श्रीमंत धनाढ्यांनी या नगरामधे बंगलो खरेदी केले आहेत. एक रूम व किचनचा ३१० स्क्वेअर फ्लॅट घेतलेला फ्लॅटधारक आणि 3 BHK बंगलो असलेला बंगलो मालक, दोन - दोन फ्लॅट घेऊन ते एकत्र करून 4 BHK मधे राहणारे फ्लॅटधारक हे सर्वजण एकच मजल्यावर आनंदाने राहतात. 

       *मला नगर उभारतांनाच गरीब - श्रीमंत हा भेद मिटवायचा होता. त्यांच्यामधील दरी कमी करायची होती. ती करण्यात मी कमालीचा यशस्वी झालो. म्हणूनच गरीबातला गरीब माणूसही फ्लॅट घेण्याचे धाडस करतोय.* तर एक सुरक्षित नगर, चांगले नगर, चांगले वस्ती पाहुन अनेक वरीष्ठ शासकीय अधिकारी व श्रीमंत लोकंही या नगरामधे राहायला येतात. *वाडा शहरामधे राहण्यासाठी योग्य ठिकाण कोणते ? असे विचारल्यास शरद नगर हेच उत्तर सर्वांच्या तोंडुन निघते.* कायमस्वरूपी वास्तव्य करून राहण्यासाठी शरद नगर हेच एकमेव ठिकाण आहे, त्यामुळे फ्लॅट खरेदीदारांची पहिली पसंती शरद नगर हिच असते. 

       *' शरद नगर ' हे मी माझ्या नावासाठी व एका पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी उभारले आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा माझा उद्देश नाही.* ' ना नफा - ना तोटा ' या धर्तीवर मी अनेकांना फ्लॅट दिले आहेत. मला अनेकजण विचारतात की, "तुम्हाला एवढ्या कमी किंमतीमधे फ्लॅट विकणं कसं परवडतं ?" मी त्यांना उत्तर देतो, *"मी शरद नगरची जी जागा खरेदी केली आहे, ती खुप पूर्वी. तेव्हा या माळरानावर काहीही नव्हते.* ही जमीनही कुणी खरेदी करत नव्हते. त्यामुळे जागा स्वस्त मिळाली. मला कुठलेही नाद - छंद नाहीत त्यामुळे माझा इतर वाढीव कुठलाही खर्च नाही. मी कुणालाही पैसे देत नाही. माझ्याकडुन कुणीही पैसे मागत नाही. त्यामुळे माझा खर्च खुपच कमी आहे. खुप सार्‍या पैशांची हाव मला नाही. त्यामुळे स्वस्तात फ्लॅट विकणं मला परवडतं. *माझी इतर कुठल्याही बिल्डरशी स्पर्धा नाही. फक्त माझं स्वतःच्या नावाचं नगर उभारायचं आणि त्या नगरामधे गरीबांनाही फ्लॅट घेता यावेत, हाच माझा उद्देश आहे.* 

       खरं तर शरद नगर उभारताना मी जे - जे संकल्प केले होते, ते - ते सर्व जिद्दीने पूर्ण केले आहेत. नगरामधे प्रवेश करतानाच चांगले प्रवेशद्वार आहे. प्रवेश द्वारावरच स्वप्नपूर्ती गणपती बाप्पाचे मंदिर आहे. अंतर्गत रस्ता चांगला सिमेंट काँक्रीटचा आहे. अंतर्गत गटारी बंदिस्त असल्याने गटारीचे पाणी कुठेही रस्त्यावरून वाहात नाही. पार्किंगची सुविधा आहे. खेळासाठी मैदान आहे. चांगले गार्डन आहे. *कार्यक्रमांसाठी यशवंत रंगमंच व जेष्ठांसाठी लक्ष्मीबाई पार्क आहे.* ओपन जीम आहे. चोवीस तास पाण्याची व्यवस्था आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. 

       *हे नगर शहरापासुन थोडेसे लांब असल्याने शहरातील गजबटापासुन दुर आहे पण शहरातच असल्याने गावाकडच्या आनंदाचा उपभोगही मनसोक्त घेता येतो.* वातावरण शांत आहे. रस्त्याच्या कडेला स्ट्रीट लाईट अर्थात विजेची सोय आहे. बसण्यासाठी बाकडे व गजू आहेत. मुलांसाठी खेळायला खेळणी व पाळणे आहेत. पूर्ण नगराला CCTV बसवले आहेत. सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली आहे. उच्चदर्जाचे बांधकाम केले आहेत. त्यामधे कुठलीही तडजोड केली जात नाही. आम्ही ग्राहकाला एकदा शब्द दिला की, त्यामधे कधीही दिलेला शब्द खाली पडू दिला जात नाही. *आम्ही शब्द देतो, आम्ही शब्द पाळतो, हे आमचे ब्रिदवाक्य आहे. कुठल्याही ग्राहकाची कधीही फसवणूक होणार नाही,* याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो, त्यामुळे गरीबातल्या गरीब माणसांचाही आमच्यावर विश्वास आहे. म्हणूनच शरद नगर मध्येच गरीबातला गरीब माणूस ही त्यांच्या स्वप्नातील घर घेऊ शकतो.

       शरद नगर हे आमचे एक कुटूंबच आहे. माझा तर तो श्वास आहे. *मला पैसा, मान - सन्मान वा जे काही मिळालं ते शरद नगर मुळेच.* मी शरद नगरसाठी जे - जे करायचं ठरवलं होतं ते सर्व काही प्रामाणिकपणे केलं. अखेरच्या श्वासापर्यंत करतच राहणार आहे. कारण *'शरद नगर'* हीच माझी खरी ओळख आहे. माझ्या या नगरामधे गरीब पण चांगल्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिष्ठित सुसंस्कृत रहिवाशी मंडळींचं मनापासुन स्वागत आहे.